गडचिरोली : शहरी भागातील झोपडपट्टीसदृश भागातील नागरिक दैनंदिन कामकाजाच्या वेळेमुळे आरोग्य सेवेपासून वंचित राहात आहेत. त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यात १५ आपला दवाखाना सुरू केला जात आहे.हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे या दवाखान्याचे नाव राहणार आहे. त्यापैकी ४ दवाखान्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आॅनलाईन पद्धतीने केले.
या दवाखान्यात, अर्थात नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्रामध्ये मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी वाटप, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, एवढेच नाही तर महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाहय यंत्रणेदवारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची संदर्भ सेवा मिळणार आहे. विशेष म्हणजे येथील बाहयरुग्ण सेवा दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार आहे.
गडचिरोलीतील गोकुळनगर भागात या दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, गडचिरोली न.प.चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, डॉ.स्वप्नील बेले, डॉ.सचिन हेमके, डॉ.सुनील मडावी, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.बागराज धुर्वे, डॉ.रुपेश पेंदाम, डॉ.सीमा गेडाम, डॉ.राहुल थिगळे व आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
प्रत्येक तालुका मुख्यालयी एक, गडचिरोलीत तीन दवाखाने
गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज आणि कुरखेडा येथे प्रत्येकी एक दवाखाना सुरू करण्यात आला आहे. काही दिवसातच इतर तालुका मुख्यालयीही असे दवाखाने सुरू होणार असून गडचिरोली शहरात आणखी दोन दवाखाने होतील. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्रांत मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिणा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.