अहेरी : राजपूर पॅच येथील रहिवासी शंकर पोशन्ना गंगाधरीवार (५२) यांच्या पायाला दोन महिन्यांपूर्वी इजा झाली. कालांतराने त्या इजेचे रूपांतर मोठ्या व्याधीत होऊन शंकर पोशन्ना गंगाधरीवार यांच्या पायाला गंभीर आजार उद्भवला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना योग्य उपचार घेणे शक्य होत नव्हते, त्यामुळे निराश होऊन ते घरीच थातुरमाथूर उपचार घेत होते. ही बाब बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महेश बाकीवार यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना कळवल्यानंतर त्यांनी संबंधित रुग्णाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली.
शंकर गंगाधरीवार यांच्यावर आधी अहेरी ग्रामीण रुग्णालयात उपचार होते होते. संपूर्ण तपासण्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले, परंतु त्या ठिकाणीही योग्य इलाज झाला नाही. अशात त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेले महेश बाकीवार यांनी त्यांना वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. परंतु त्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. ही अडचण भाग्यश्री आत्राम यांनी दूर केली.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले कुटुंब आजारपणामुळे शारीरिक आणि मानसिकरीत्या खचून जातात. रुग्णांना आर्थिक मदतीची, मानसिक पाठिंब्याची व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची नितांत गरज असते. त्यातूनच बोरी येथील त्यांचे विश्वासू महेश बाकीवार व रामा बद्दीवार यांच्यामार्फत आर्थिक मदत केली. यावेळी अशोक वासेकर, विजय कोकिरवार हे पदाधिकारीही उपस्थित होते.