गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागावच्या बहुचर्चित विषबाधा प्रकरणात आरोपी संघमित्रा कुंभारे हिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. अविनाश ताजने असे त्याचे नाव आहे. एकापाठोपाठ सर्वांना संपविण्याचा कट त्याच्याशी चर्चा करूनच शिजला होता. पाच जणांच्या हत्येत वापरण्यात आलेले जालिम विष संघमित्राच्या त्या मित्रानेच आणून दिल्याने त्याला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.
महागाव येथील शंकर कुंभारे यांच्या परिवारातील पाच व्यक्तींचा एकापाठोपाठ एक संशयास्पद मृत्यू झाल्याने या रहस्यमय प्रकरणाचे गूढ वाढले होते. पण अहेरी पोलिसांनी हे गूढ उकलत त्या व्यक्तींवर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट करत थंड डोक्याने हे हत्याकांड घडवून आणणाऱ्या कुटुंबातीलच दोन महिलांना अटक केली होती.
या प्रकरणात शंकर कुंभारे यांच्यासह त्यांची पत्नी विजया कुंभारे, मुलगा रोशन कुंभारे, मुलगी कोमल दहागांवकर आणि शंकर यांची साळी वर्षा ऊर्फ आनंदा उराडे अशा व्यक्तींना जीव गमवावा लागला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेवून अहेरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके तयार करून सदर गुन्ह्राचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सोपविला. त्यांना अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
हत्याकांडासाठी तीन वेळा खरेदी केले विष
आरोपींच्या पोलिस कोठडी रिमांडदरम्यान त्यांनी या घटनेबद्दल सखोल माहिती दिली. विषप्रयोगासाठी तीन वेळा वेगवेगळे विष खरेदी केले होते. सुरूवातीला दोन वेळा खरेदी केलेले विष अन्नपदार्थात मिसळविल्यास अन्नपदार्थाची चव आणि रंग बदलत असल्याने त्यांनी ते विष न वापरण्याचा निर्णय घेतला. पुढे मुंबई येथुन अतिघातक रासायनिक विष बोलावून ते शंकर कुंभारे व त्यांच्या परिवाराच्या अन्नपदार्थात मिसळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संघमित्राचा पूर्वाश्रमीचा मित्र अविनाश ताजने याने ते विष खरेदी करण्याकरीता संबंधित कंपनीला पैसे पुरविल्याचे निष्पन्न झाले.
अकोल्यात झाले हत्याकांडाच्या कटावर शिक्कामोर्तब
अविनाश ताजने आणि संघमित्रा कुंभारे हे दोघे शालेय जीवनापासून मित्रमैत्रिण आहेत. संघमित्रा हिचा रोशन कुंभारे यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही दिवस त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. परंतु संघमित्राची प्रकृती ठिक राहात नसल्यामुळे ती उपचारासाठी माहेरी अकोला येथे गेली असताना ती परत अविनाश ताजने याच्या संपर्कात आली. तिने तिच्या सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्याला सांगितले. नजीकच्या काळात त्यांच्यातील संपर्क वाढल्याने संघमित्रा हिने तिच्या सासरच्या व्यक्तींना मारण्याची योजना अविनाश ताजने याला सांगून त्याची मदत मागितली. तेव्हा अविनाश याने संघमित्राच्या सांगण्यावरून दोन वेळा विष खरेदी केले. ते विष खरेदी करण्याकरीता पैसे पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न होताच एक तपास पथक अकोला, खामगांव परिसरात रवाना करून अविनाशला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आरोपी संघमित्रा कुंभारे आणि रोजा प्रमोद रामटेके यांनाही ४ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, मनोज काळबांडे, पोलीस निरीक्षक बालाजी सोनवणे, सहा.पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व तपास पथकातील अंमलदारांनी केली.