येत्या १ जानेवारीपर्यंत १८ वर्षाचे होणार? तुम्हालाही मिळेल मतदानाचा अधिकार

ऐका जिल्हाधिकारी मीना काय सांगतात...

गडचिरोली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. त्यासाठी मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. २७ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मात्र येत्या १ जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवतरुणांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी, तसेच कोणत्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.

या तयारीसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रसेनजित प्रधान उपस्थित होते. विशेष म्हणजे मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात ४, ५, २५ आणि २६ नोव्हेंबर असे चार दिवस विशेष नोंदणी शिबिरही ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ९४८ मतदान केंद्रांवर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या यादीतील नावांवर हरकती स्वीकारणे, नव मतदार नोंदणी करणे, नावे वगळणे आणि दुरूस्ती करणे हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार नोंदणीसंबंधाने काही अडचणी असल्यास जिल्हा मतदार मदत केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १९५० वर संपर्क करावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ८ लाख मतदार

जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ लाख २७९९ मतदार आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत या मतदारांचे प्रमाण ६९.५९ टक्के आहे. एकूण मतदारांमध्ये ४ लाख ६२६४ पुरूष, तर ३ लाख ९६ हजार ५२८ महिला मतदार आहेत. सर्वाधिक मतदार २० ते ४० या वयोगटातील आहेत.