अहेरी : येथील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेला दुचाकीने जाताना भर रस्त्यात गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची, तसेच भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची लेखी तक्रार अहेरी पोलिसांकडे केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर ग्रामसेविका पूर्वी अहेरी तालुक्यातील एका गावात कार्यरत होती. त्यावेळी, म्हणजे सन 2011 ते 2022 दरम्यान झालेल्या कामातील गडबडीसाठी त्या दोन भाजप पदाधिकाऱ्यांकडून तिला पैशाची मागणी केली जात होती असे नगरसेविकेचे म्हणणे आहे. तसेच एक नवीन रुग्णवाहिका घेऊन द्या, असेही ते महिला ग्रामसेविकाला म्हणत होते. त्यासाठी तुमच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू व सोशल मीडियावर बदनामी करु अशी धमकी देत होते. तसेच एका व्हॅाट्स अॅप गृपवर ग्रामसेविकेविरुद्ध रोज मॅसेज पोस्ट करुन नाहक बदनामी केली जात होती. या सर्व प्रकारानंतर आता रस्त्यात अडवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ग्रामसेविकेने केली आहे.
महिनाभरानंतर तक्रार का?
दरम्यान त्या ग्रामसेविकेची एटापल्ली पंचायत समितीला बदली झाल्यानंतर महिनाभरापूर्वी ती आपल्या दुचाकीने अहेरी येथून एटापल्लीत जात असताना तिला रस्त्यात अडवले. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटून ती एटापल्लीत पोहोचली. पण त्यानंतर महिनाभरानंतर म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी ग्रामसेविकेने अहेरी पोलिसात तक्रार दिली. इतक्या दिवसानंतर तक्रार आल्यामुळे या प्रकरणातील सत्यता पडताळणीचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल, असे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी सांगितले.