गडचिरोली : जिल्ह्यातील 422 ग्रामपंचायतींमध्ये फिरणार असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ बुधवारी (दि.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आला. आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्ह्यात वैरागड आणि पोटेगाव येथे पंतप्रधानांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासोबत प्रत्यक्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वैरागड येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते या संकल्प यात्रेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षाच्या कार्यकाळात समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ असल्याचे सांगून, या विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार शासकीय कर्मचाऱ्यांनी करून नागरिकांना त्याचा लाभ द्यावा, तसेच नागरिकांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी खा.अशोक नेते यांनी केले.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी एलपीजी गॅस सिलिंडर, आयुष्मान भारत योजना, आभा कार्ड अशा पद्धतीने विविध स्टॅाल लावून नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांना पंचप्राण शपथ देण्यात आली.
यावेळी आ.कृष्णा गजबे, सीईओ आयुषी सिंह, अतिरिक्त सीईओ राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, आरमोरीचे तहसिलदार श्रीहरी माने, बीडीओ मंगेश आरेवार, वैरागडच्या सरपंच संगिता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, सदानंद कुथे, माजी जि.प.सदस्य संपत आळे, पुनम गुरनुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वडपल्लीवार यांनी केले.