गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य- ना.आत्राम

पोटेगाव येथे विकसित भारत यात्रेचा शुभारंभ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून विकासाच्या बाबतीत या जिल्ह्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. पोटेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी विवेक साळुंके, तहसीलदार संदीप कराडे, महेंद्र गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे, असे सांगून मंत्री धर्मरावबाबा म्हणाले, आज या मोहिमेचा शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा होत आहे. सदर मोहीम जिल्हयातील अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या 10 तालुक्यातील 422 ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.

पुढे ते म्हणाले, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. जिल्ह्यातील रस्ते, पूल व मूलभूत सुविधांसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जवळपास 4 लक्ष 50 हजार नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या धर्तीवर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्यामुळे सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहे, असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.