आरमोरी : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२१-२२ चा ‘आदिवासी सेवा संस्था पुरस्कार’ हा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन्मानपत्र आणि ५०,००१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदिवासी सेवक/संस्था पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कोरोनाकाळामुळे चार वर्षांपासून हे पुरस्कार घोषित झाले नव्हते. चारही वर्षातील पुरस्कारांची गुरूवारी एकाच वेळी घोषणा करण्यात आली.
श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी सन २०२१-२२ मध्ये संस्थेला पुरस्कार मिळावा यासाठी आदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांच्या संस्थेच्या प्रस्तावाची व कार्याची शासनाने दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड केली. यात संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे, सचिव गिरिधर नेवारे, संचालक सुरेश मेश्राम, यादवराव कहालकर, धर्मा दिघोरे, गोपाल खरकाटे, शेषराव काटेगे, धर्मराज मरापा, दामोदर मानकर, उज्वला मडावी, गोपिकाबाई कोल्हे यांचेही श्रेय असल्याचे घोडाम यांनी कळविले.
ही जंगल कामगार संस्था विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. आदिवासींच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यापासून तर आरोग्य, शिक्षण यासाठीही अनेक शिबिरे आणि उपक्रम संस्थेने राबविले आहेत.