आलापल्ली : राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल आलापल्ली येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे डॅा.चरणजितसिंग बलवीरसिंग सलुजा यांना शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२२-२३ या वर्षासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. सन्मानपत्र आणि २५००१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॅा.सलुजा अनेक वर्षांपासून आलापल्ली येथे राहून परिसरातील आदिवासी नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. तसेच त्यांना चांगल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थाना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी पुरस्कार दिले जातात. राज्यस्तरीय निवड समितीमार्फत या पुरस्कारासाठी संस्था आणि व्यक्तींची निवड केली जाते. परंतू गेल्या चार वर्षांपासून हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते. त्यामुळे गुरूवारी (दि.२३) एकाचवेळी २०१९-२० पासून २०२२-२३ पर्यंत चारही वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी सतीश कोवे यांनी या पुरस्कारांची यादी जाहीर केली.