आरमोरीत रात्रकालीन ‘प्रकाश चषक’ क्रिकेट सामन्यांची धूम, हजारोंची बक्षिसे

विदर्भाच्या अनेक भागातील संघांचा सहभाग

आरमोरी : गेल्या आठवडाभरापासून आरमोरी येथे सुरू असलेल्या रात्रकालीन प्रकाश चषक टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धेचा ज्वर आता चांगलाच वाढला आहे. ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या पुढाकारातून गेल्यावर्षीपासून आरमोरीत ही रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेची परंपरा सुरू झाली असून ती संपूर्ण आरमोरी तालुक्यासाठी आकर्षणाचे केंद्र झाली आहे.

यावर्षीच्या स्पर्धेचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, प्राचार्य डॅा.सचिन खोब्रागडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सेवानिवृत्त प्रा.गंगाधर जुवारे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद सावकार म्हणाले, आल्हाददायक वातावरणात प्रकाश चषक स्पर्धेची सुरूवात युवावर्गासह सर्व क्रिकेट रसिकांना आनंद देईल. दैनंदिन कामकाज, विविध प्रकारच्या ताण-तणावातून बाहेर येऊन क्रिकेट सामन्यांमधील चुरस आणि मनोरंजनाने सर्वजण ताजेतवाने होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही मोठ्या शहरांमध्येच असे रात्रकालीन क्रिकेट सामने खेळविण्याची सुविधा आहे. ती सुविधा प्रकाश चषकाच्या निमित्ताने आपल्या आरमोरीत झाली. त्यामुळे याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी इतरही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन अक्षय हेमके यांनी तर आभार पंकज खरवडे यांनी मानले.