हत्ती आणि वाघांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोलीच्या शेतकऱ्यांचे चंद्रपुरात आंदोलन

काँग्रेसकडून वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या

गडचिरोली : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रानटी हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे. वनविभागाच्या वतीने यावर कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गुरूवारी थेट वनमंत्र्यांच्या घराजवळ चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी हत्ती, वाघांच्या बंदोबस्ताच्या मुख्य मागणीसह इतरही मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,  युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता मोहरकर यांच्यासह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.