कोनसरी लोहप्रकल्पाचे 9 डिसेंबरला उद्घाटन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार

गडचिरोली येणार औद्योगिक नकाशावर

गडचिरोली : आतापर्यंत मोठ्या उद्योगांपासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या कोनसरी लोहप्रकल्पाचे उद्घाटन येत्या ९ डिसेंबरला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या चिचडोह बॅरेजचे लोकार्पण आणि गडचिरोली-वडसा लोहमार्गाच्या कामाची प्रत्यक्ष सुरूवातही ते रिमोटने करणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

एकूण २० हजार कोटींच्या कोनसरी लोहप्रकल्पातील ४०० कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. त्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन यावेळी अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याचे खा.नेते यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिवसा सलग १२ तास वीज मिळणार असल्याचेही खा.नेते यांनी यावेळी सांगितले.

रेल्वेमार्गाची किंमत गेली 1888 कोटीवर

वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गातील वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गाने वडसा ते आरमोरीपर्यंत या रेल्वेमार्गासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल केले जाणार आहेत. आरमोरीजवळही उड्डाणपूल बनविण्याचे सूचित केल्यामुळे या रेल्वेमार्गाची किंमत आता आणखी वाढून ती 1888 कोटीवर गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के वाटा उचलण्यास तयार असल्याचे यावेळी खा.नेते यांनी सांगितले.

पत्रपरिषदेला आ.डॅा.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, विलास भांडेकर, डॅा.भरत खटी,बंडू झाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अखेर गडचिरोली येणार औद्योगिक नकाशावर

दळणवळणाच्या साधनांचा अभाव, वनकायद्याच्या अडचणी आणि नक्षलवाद्यांकडून पावलोपावली आणले जात असलेले अडथळे यामुळे आतापर्यंत गडचिरोली जिल्हा औद्योगिक नकाशावर कुठेच नव्हता. राईस मिल आणि इतर काही छोट्या उद्योगांचा अपवाद वगळ्यास या जिल्ह्यात मोठा एकही उद्योग नव्हता. अशा स्थितीत नक्षलवाद्यांच्या विरोधाला न जुमानता जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी लॅायड्स मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्सच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुरजागडमधील लोहखनिज काढण्यासह कोनसरीचा प्रकल्प उभारण्यासाठी मोलाची भूमिका वठविली आहे. या प्रकल्पासाठी जमीनधारक शेतकऱ्यांचे मन जिंकून स्थानिक नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्याबाबत प्रभाकरन यांनी दिलेला शब्द ते खरा करून दाखवतील, असा विश्वास कोनसरी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.