रानटी हत्तींमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी वनकार्यालयावर धडक

कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिक एकवटले

गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात रानटी हत्तींनी हैदोस माजवून अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाची नासाडी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मोठे नुकसान झाले आहे. तसेच रानटी हत्तींनी मरेगाव येथील शेतकऱ्याचा जीव घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव नुकसानभरपाई देण्यात यावी आणि मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी (दि.30) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी वन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून रानटी हत्तींच्या हल्ल्यात जीव गेलेल्या मृतकांच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावांच्या परिसरात रानटी हत्तींनी धुमाकुळ घातला आहे. ऐन धान कापणी व मळणीची कामे सुरू असताना रानटी हत्तींनी नासाडी केली. याशिवाय २५ नोव्हेंबर रोजी धान पिकाचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनोज प्रभाकर येरमे या शेतकऱ्याला रानटी हत्तीने चिरडून ठार केले. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे जनक्षोभ उसळला असून वनविभागाप्रती संतापाची लाट उसळली असल्याचे यावेळी अरविंद कात्रटवार यांनी वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सोन्यासारखे धान पिक हातात येण्यापुर्वीच रानटी हत्तींनी नेस्तनाबूत केल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा भागवावा, बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेत नुकसानग्र्स्त शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे त्यांना लवकर दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

याप्रसंगी शिवसेना (उबाठा)चे यादव लोहंबरे, संदीप आलबनकर, अमित बानबले, संदीप भुरसे, सुरज उईके, दीपक लाडे, दिलीप वेलादी, दयाराम चापडे, विनोद खेवले, ज्ञानेश्वर सुरकर, राजेंद्र चनेकार, महादेव हजारे, मयुर भोयर, महेश राजुरकर, संजय यम्पलवार, चुडाराम मुनघाटे, महेश बानबले, अजय कोटगले, नागेश धारणे, दादाजी मुनघाटे, प्रफुल डोईजड, भाष्कर सुरकर, अंबादास मुनघाटे, प्रशांत ठाकूर, अनिकेत मुनघाटे, दिपक लाडे, नयन भोयर, राहुल सावरकर, यशवंत भोयर, कैलास लाडे, सचिन सेलोटे, राहुल मडावी, सुरज वलादी, सुधीर बावणे, लोकेश गिरोले, हेमराज अमरापूरे, भैय्याजी फुलझेले, बाळू हर्षे, निकेश हर्षे, कुणाल आवारी, मुकूंदा कोडाप, अभिषेक म्हशाखेत्री, आदित्य सेलोकर, देवाजी कोसमसिले, महेश खेडेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.