गडचिरोली : अनुसया हॉस्पिटल आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा जोगीसाखरा येथे मोफत रोगनिदान शिबिर पार पडले. शिबिरामध्ये सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून, उपस्थित ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले.
या शिबिराला अनुसया हॉस्पिटलच्या डॉ. शिलू चिमुरकर, डॉ. महेश कोपुलवार, जोगीसाखराचे सरपंच संदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ज्योती घुटके, वैशाली चापले, प्रतिभा मोहुर्ले, करिष्मा मानकर, अश्विनी घोडाम, गुरुदेव कुमरे, स्वप्नील गरफडे, देविदास ठाकरे यांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये महिला पुरुषांशी निगडित आजारांवर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन करीत तपासणी केली. नॉर्मल आणि सिजर डिलिव्हरी, वंध्यत्व, पाईल्स, अपेंडिक्स, हायड्रोसिल, कॅन्सर, हर्निया आणि फिशर आदी आजारासंदर्भातही जागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. हे हेल्थ कार्ड नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती देणार असून, आरोग्याचे पासबुक ठरणार आहे. ज्या नागरिकांनी फॅमिली हेड कार्डमध्ये नोंदणी केली, त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या हेल्थ कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य माहिती नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिलू चिमुरकर यांनी यावेळी दिली. फॅमिली हेल्थ कार्ड नोंदणी मोफत असून, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.