अविनाश भांडेकर यांना मंत्रालय व विधिमंडळ संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

गडचिरोली : मंत्रालय व विधिमंडळ संघाच्या वतीने दिल्या जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून पुण्यनगरीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांना देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अविनाश भांडेकर यांनी 32 वर्षाच्या पत्रकारितेत विविध प्रश्नांना वाचा फोडली. भांडेकर यांच्या पत्रकारितेतील या कार्याची दखल घेऊन मंत्रालय व विधिमंडळ संघाने त्यांची सन 2022 -23 च्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली होती. गडचिरोलीसारख्या क्षेत्रातील पत्रकाराचा मुंबई येथे झालेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलून इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडियाचे महत्व वाढले असले तरी प्रिंट मीडियाचे महत्व कमी झालेले नाही. पत्रकारांनी वस्तूनिष्ठ बातम्या व शासनाच्या विविध योजना समाजापर्यंत पोचविल्या पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बंदरे व खाणीकर्म मंत्री दादा भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, माहिती विभागाचे प्रभारी महासंचालक, मंत्रालय व विधिमंडळ संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाहक प्रवीण पुरो, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, वैशाली भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.