गडचिरोली : महिलांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून, तसेच बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. महिलांनी या योजनांचा लाभ घेतला तर निश्चितच त्यांचा अर्थिक स्तर उंचावून त्या सक्षम होतील, असे प्रतिपादन भाजपचे लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोद पिपरे यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत व समाजकल्याण विभाग तथा दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगर येथील नप प्राथमिक शाळेजवळील खुल्या आवारात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद पिपरे बोलत होते.
महात्मा ज्योतीराव फुले जन धन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्डचे वाटप, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, केंद्र शासन सहाय्यित योजना, महाआरोग्य शिबिर, कृषी चिकित्सालय, हत्तीरोग अभियान, पोस्ट ऑफिस, बँकऑफ इंडियाचे खाते उघडणे, अशा इतरही अनेक शासकीय योजनांविषयी माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. याप्रसंगी पंतप्रधान आवास योजनांचे चेक, प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे चेक आणि मंजूर पत्र माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी नप सभापती केशव निंबोड, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका बेबी चिचघरे, उपमुख्यीधिकारी रवींद्र भांडारवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र मुरमुरवार, तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र सोनवाने व सूर्यकांत मडावी यांनी केले.