गडचिरोली : महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि इतर कर्मचारी समाजाच्या आणि जिल्ह्याच्या उन्नतीसाठी परिश्रम करत असतात. गेल्या 10 वर्षांत सा.बां.विभागाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात इमारती, पूल आणि विविध समाजोपयोगी वास्तू उभारण्यात आल्या. परंतु या सर्व प्रकल्प आणि वास्तूंचे डॉक्युमेंटेशन कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे या कामांचा एकत्रित संग्रह असावा यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अभियंता वर्गाच्या वतीने ‘गौरवगाथा गडचिरोलीची’ या नावाच्या कॉफीटेबल बुकची निर्मिती करण्यात आली. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे गेल्या १० वर्षांमध्ये उभारण्यात आलेल्या विविध वास्तू आणि इमारतींचे फोटोग्राफ्स आणि इतर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी अशा पद्धतीच्या कॉफीटेबल बुकची निर्मिती कौतुकास्पद पाऊल ठरले आहे. आता जशी एका जिल्ह्याने पुढाकार घेऊन अशा पद्धतीच्या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली, तशीच अन्य विभागीय केंद्रांनी देखील असे कॉफीटेबल बुक प्रकाशित करावे. यामुळे सा.बां.विभागाची प्रतिमा जनमानसामध्ये सकारात्मकरित्या उंचावली जाईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी संवाद साधताना व्यक्त केले. भविष्यात हे कॉफीटेबल बुक डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी सा.बां.विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, गडचिरोली जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.