तुम्ही कितीही अडथळे आणा, आम्ही रेती चोरी करणारच !

यंत्रणेच्या नाकावर टिच्चून चोरट्यांचे आव्हान

देसाईगंज : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहात असलेली वैनगंगा नदी रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. देसाईगंज तालुक्यातील मेंढा घाटावरून अनधिकृतपणे रेती काढली जात असल्याची बातमी आल्यानंतर तालुका प्रशासनाने त्या रेतीघाटावर वाहनांना रोखण्यासाठी जेसीबीने मोठा खड्डा खोदला होता. पण तस्करांनी शक्कल लढवत आता आपला मोर्चा पिंपळगाव घाटाकडे वळवला असून पुन्हा रेतीची चोरी करणे सुरू केले आहे. त्यासाठी नदीपात्रातून चक्क कच्चा रस्ताही तयार केला आहे. त्यामुळे एवढी हिंमत करणाऱ्या या तस्करांना प्रशासनातील कोणाचे अभय तर नाही ना? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील रेतीघाटातील रेती सर्रासपणे चोरी होत आहे. आधी चोरट्यांनी कोंढाळा येथील मेंढा घाटावरून लाखो रुपयांची रेती तस्करी सुरू केली होती. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कोंढाला येथील मेंढा घाटावर प्रशासनाने जेसीबीव्दारे मोठा खड्डा तयार करून रेती तस्करांच्या वाहनांचा मार्ग अडविला होता. त्यामुळे काही दिवस रेती तस्करी बंद करण्यात आली होती.

आता कोंढाळा येथील पिंपळगाव घाटाचा शोध घेऊन चक्क नदीपात्रात अर्धा किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरने मुरूम टाकून रस्ता बनवून रेती तस्करी केली जात असल्याचे दिसून येते.