गडचिरोली : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात आले. वनमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते, गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही व्याघ्र स्थलांतराची प्रक्रिया शनिवारी पार पडली.
राज्यात एकूण २५ वाघांचे अशा पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे. त्यापैकी सदर दोन वाघिणींना स्थलांतराचा पहिला मान मिळाला. त्या वाघिणी आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या वनपर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यासोबत त्यांची वंशावळही त्या व्याघ्र प्रकल्पात वाढणार आहे.
भारतीय वन्यजीव संस्थानच्या चमुच्या मदतीने ब्रह्मपुरी व चंद्रपूर भूभागातील या वाघिणीचे स्थलांतर करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पारंपरिक आदिवासी नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.