गडचिरोली : विसापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील समस्या सांगण्यासाठी गेलेल्या मुलींना तेथील अधीक्षिकेने जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार वसतिगृहातील मुलींनी पोलिसात केली. विशेष म्हणजे वसतिगृहातील समस्या दूर करण्याकडे अधीक्षिकेसह समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांचेही दुर्लक्ष होत असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.
यावेळी माहिती देताना टेंभुर्णे यांनी सांगितले की, वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना वर्षभरापासून निर्वाह भत्ता मिळालेला नाही. भर उन्हाळ्यात त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. या समस्या घेऊन वसतिगृहातील मुली अधीक्षिका माया डोंगरवार यांच्याकडे गेल्या असता त्यांनी मुलींचे काहीएक एेकून न घेता त्यांनाच शिविगाळ केल्याचा आरोप टेंभुर्णे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
पत्रपरिषदेला जी.के.बारसिंगे, बशिद शेख, दिलीप बांबोळे, जावेद शेख, सोनलजित देवतळे, मनोहर कुळमेथे, विलास केळझरकर, भारत रायपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यासंदर्भात अधीक्षिका माया डोंगरवार यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनी मोबाईल काॅल स्वीकारला नाही.
वसतिगृहातील मागासवर्गिय मुलींना अधीक्षिकेकडून शिविगाळ?
पोलिसात तक्रार दाखल, वंचित बहुजन आघाडीकडून कारवाईची मागणी