सिरोंचा : ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचा तालुका मुख्यालयातील ख्रिश्चन बांधवांच्या घरी भेट देऊन केक आणि गोड पदार्थ भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस ख्रिसमस सण म्हणून उत्साहाने साजरा करतात. युरोपियन देशात या दिवसाचे औचित्य साधत शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंचे जीवनकार्य दाखवले जाते. हा सण ख्रिस्तीधर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. या दिवशी सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी भावना मुलांमध्ये असते. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात.
याचेच औचित्य साधून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचा शहरातील ख्रिस्तीधर्मीय बांधवांच्या प्रत्येक घरी भेट देऊन त्यांच्यासोबत हा सण साजरा केला. यावेळी त्यांनी केक आणि गोड पदार्थ भेट देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम.डी.शानू, सपना मुरकुटे, लोकेश मुरकुटे, श्रीनिवास आदी उपस्थित होते.