आलापल्ली : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली अनेक वर्षांपासून राजकारण करत असलेले अजय कंकडालवार आपल्या कार्यकर्त्यांसह अखेर रविवारी काँग्रेसवासी झाले. विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसचा हात पकडला. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या तिकीटवर लढू इच्छिणाऱ्या माजी आ.दीपक आत्राम यांना आपली लढाई एकाकीपणे लढावी लागणार आहे.
ना.वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, लोकसभा प्रभारी डॅा.नामदेव किरसान यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कंकडालवार यांच्यासोबत आतापर्यंत आविसं मध्ये काम करत असलेले पाचही तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसवासी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे आतापर्यंत अहेरी विधानसभा मतदार संघाकडे काँग्रेस पक्षाचे दुर्लक्ष होते. परंतू नवीन समीकरणात ना.धर्मरावबाबा आत्राम सत्तारूढ झाल्यामुळे या मतदार संघातून पुन्हा काँग्रेस आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस कोणाला आपला उमेदवार म्हणून पुढे करणार आणि काँग्रेस या मतदार संघात आपले पाय कितपत स्थिरावू शकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.