केवळ आरक्षणामुळे नाही, तर बुद्ध स्वीकारल्याने प्रगती- आंबेडकर

कोरचीत जमले तीन राज्यातील अनुयायी

कोरची : नक्षलप्रभावीत कोरची येथील धम्मभूमीवर दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फेलोशिप आँफ बुद्धिस्टच्या स्टँन्डिंग कमिटीचे सचिव डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या धम्म प्रबोधनाचा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील दोन ते अडीच हजार अनुयायी उपस्थित होते. बौद्ध समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नव्हे, तर बुद्ध स्वीकारल्यामुळे झाली, असे प्रतिपादन यावेळी आंबेडकर यांनी केले.

मोटारसायकल रॅलीने जयघोष करीत आणि समता सैनिक दलाने बँडच्या तालावर डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत करत कार्यक्रमस्थळी आणले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, 1956 ला स्विकारलेल्या बुद्धाच्या धम्मामुळे आमच्या जगण्यात आमुलाग्र बदल झाला. बुद्ध धम्म न स्विकारलेल्या अनुसूचित जातीतील इतर बांधवांना संविधानातील सर्व सवलती लागू असतानासुद्धा ते मागे पडलेले दिसतात. त्याचे कारण शोधावे आणि बुद्धाच्या वाटेने यावे, परंतु आरक्षणाची विभागणी करण्याची मागणी करू नये, असे आवाहन यावेळी आंबेडकर यांनी केले.

कोरचीत डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे पहिल्यांदाच आगमन झाल्याने येथील बौद्ध बांधवांनी लुम्बिनी विहारापासून मोटारसायकल रॅली काढली. यानंतर मुख्य बाजार चौकात बौद्ध झेंड्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर बँड पथकाच्या तालावर समता सैनिक दलाने सलामी देऊन त्यांना धम्मभूमी या कार्यक्रमस्थळी आणले.

बुद्धभूमीवर आयोजित या धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून नागपूर विभागाचे अध्यक्ष विजय बन्सोड, जिल्हाध्यक्ष धर्मानंद मेश्राम, नगर पंचायतच्या अध्यक्ष हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हिरा राऊत, छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष एम.डी.वालदे, महाराष्ट्र राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय उपाध्यक्ष अशोक इंदुरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, प्रतिनिधी दर्शना शेंडे, बौद्ध समाजाचे कोरची तालुका अध्यक्ष अशोक कराडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास साखरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हाध्यक्ष सतीश इंगोले, दिनाजी खाडे, गडचिरोली जिल्हा पदाधिकारी हंसराज लांडगे, काका गडकरी, विभा ऊमरे, राधा नांदगाये, डॉ.विनोद चहारे, डॉ.स्वप्निल राऊत आदि प्रामुख्यने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन तालुका शाखेचे सल्लागार प्रा.देवराव गजभिये, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष किशोर साखरे यांनी तर कोषाध्यक्ष रमेश शहारे यांनी आभार मानले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर अंबादे, चंदू वालदे, चेतन कराडे, राहुल अंबादे यांच्यासह दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया, रमाई महिला मंडळ, बौद्ध समाज व बुद्धिस्ट युवा संघटना, तालुका बौध्द समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.