कुरखेडा : रानडुकराचे मांस विक्री करण्यासाठी छत्तीसगडमधून येऊन कुरखेडा तालुक्यात शिकार केली. पण वनविभागाच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात यश आले. दुचाकीवरून मांस घेऊन जात असताना ते तीन आरोपी वनविभागाच्या पथकाच्या हाती लागले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
ही कारवाई वडसा उपवनविभागाअंतर्गत येणाऱ्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रात करण्यात आली. पुराडा ते डोंगरगाव मार्गावर पिशवीत रानडुकराचे मांस भरून दुचाकीने जात असताना त्यांना रात्रीच्या सुमारास पकडण्यात आले. आरमोरी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
श्याम मरकाम (१८ वर्ष) रा.बिरेभाटा (छत्तीसगड), सागर यादव (२२ वर्ष) रा. बिरेभाटा (छत्तीसगड) आणि खटूजी नागपूरे (४५) रा. नागभीड जि. चंद्रपूर अशी त्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एच. डीघोळे व वनकर्मचाऱ्यांनी केली.