चामोर्शी पोलिसांच्या पुढाकारातून बेपत्ता बापलेकाची दिड वर्षांनी भेट

बिहारचे रहिवासी, चामोर्शीत सापडले

चामोर्शी : ते दोघे बापलेक बिहार राज्यातील रहिवासी. कामाच्या शोधात ते मुंबईत आले. पण तिथे बाप-लेकाची ताटातुट झाली. तरुण मुलाने वडीलांची शोधाशोध करून थकल्यानंतर वडील भेटण्याची आशा सोडून आपले गाव गाठले. मात्र मुंबईत हरवलेले त्याचे वडील तब्बल दिड वर्षानंतर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात आढळले. चामोर्शी पोलिसांच्या पुढाकाराने त्या बापलेकांची अखेर भेट घडवण्यात आली.

एखाद्या चित्रपटातील कथानक वाटेल अशी ही कहाणी आहे. झाले असे की, 11 जानेवारीच्या रात्री मौजा भिक्षी या गावांमध्ये एक ५० वर्षाचा वेडसर इसम आला होता. सदर इसम रस्ता भटकून फिरत होता. त्याची माहिती गावच्या पोलिस पाटील सविता भुपती वाळके यांनी चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांना दिली. पाटील यांनी तत्काळ त्या बीटचे जमादार सहाय्यक फौजदार धनंजय मेश्राम, चालक पोलीस हवालदार ईश्वर मडावी व पोलीस अंमलदार देवराम पटले यांना तिकडे रवाना करून सविस्तर चौकशी सुरू केली. त्या इसमाने त्याचे नाव मुनेश्वर किसन यादव (50 वर्ष) रा. मेसा, तालुका झुंजारपूर, जिल्हा मधुबनी (बिहार) असे असल्याचे सांगितले. मात्र बाकी कोणतेही कथानक सांगितले नाही.

त्यानंतर पोलिसांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवून त्याचा मुलगा नामे अमोलकुमार मुनेश्वर यादव यांच्याशी संपर्क केला असता त्याने मुंबईत आल्यापासून तर हरवण्यापर्यंतचे कथानक सांगितले. जुलै 2022 मध्ये त्याचे वडील मुंबईत हरवल्यानंतर त्याने त्यांचा भरपूर शोध घेतला. पण वडील सापडले नसल्याने अमोलकुमार गावी बिहार येथे परतला होता.

चामोर्शी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर आपल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी मुलगा व त्याचे नातेवाईक बिहार येथून गडचिरोलीत आले. पण तोपर्यंत मुनेश्वर यादव यांची दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था गावच्या पोलिस पाटील सविता वाळके व सरपंच अंजुबाई मोटघरे यांनी केली. नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी मुनेश्वर यांना नवीन कपडे देऊन आनंदाने मुलाच्या स्वाधीन केले.

वडील मिळेल याची आशा सोडून दिलेल्या मुलाने आणि नातेवाईकांनी चामोर्शी पोलिसांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले. त्यांची ही भेट पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.