गडचिरोली : काँग्रेस पक्षाचे नागपूर विभागीय शिबिर प्रथमच गडचिरोलीत होणार आहे. येत्या २० जानेवारीला धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात होणाऱ्या याशिबिरात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहून आगामी निवडणुकांसंदर्भात रणनिती ठरविणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
या शिबिराला राज्याचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर नागपूर येथे होणार होते. परंतू आपण हे शिबिर गडचिरोलीला घ्यावे, असा आग्रह केल्याने हे शिबिर गडचिरोलीत होत असल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले. दोन सत्रात हे शिबिर होणार आहे. या निमित्ताने संध्याकाळी गडचिरोली शहरात एक जाहीर सभाही घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आ.अभिजित वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, माजी जि.प.सदस्य राम मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
– तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आपल्या चिन्हावर लढणार…
आगामी लोकसभा निवडणूक ही महायुतीमधील घटक पक्षांसाठी एन्ट्रन्स एक्झाम आहे. त्यात ते किती टक्के यश मिळवतात यावरच त्यांची उपयोगिता ठरणार आहे. जर ते उपयोगी ठरले नाही, तर विधानसभा निवडणुकीतील सर्व जागा भाजप स्वत:च्या चिन्हावर लढवू शकते, असे भाकित यावेळी ना.वडेट्टीवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून विदर्भातील १० पैकी ८ जागा काँग्रेसच्या वाट्याला याव्यात अशी मागणीही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.