गडचिरोली : महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तीन प्रमुख पक्षांसह इतर घटक पक्षांचा महामेळावा रविवारी गडचिरोलीत घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे जुळवून घेतले त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही आपसात जुळवून घ्यावे, असा सूर या मेळाव्यातून व्यक्त झाला. लोकसभेसाठी महायुतीकडून जो कोणी उमेदवार असेल, त्याच्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करू, असा विश्वास यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
मकर संक्रांतीच्या पर्वावर महायुतीमधील घटक पक्षांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पहिल्यांदाच गडचिरोलीतील महाराजा सभागृहात आयोजित केला होता. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते.
यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, महायुतीमधून माझ्यासह तिघे जण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण महायुतीचे नेते जो उमेदवार ठरवेल त्याच्यासाठी सर्वजण काम करू. केवळ या लोकसभा निवडणुकीतच नाही तर पुढे येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही ही एकजूट कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी दिला.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, महायुतीमधील घटक पक्षांच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये जर काही मतभेद, मनभेद असतील तर ते दूर व्हावेत यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे. जगात भारताला एक नंबरचे स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा संकल्प करू. त्यासाठी एकदिलाने काम करून महाराष्ट्रात महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा निश्चय करू, असे आवाहन खासदार नेते यांनी केले. जिल्ह्यात झालेल्या विकास कामांची माहितीही त्यांनी दिली.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोध मोहिते म्हणाले, या आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिक सर्वात ईमानदार, काटक आणि शांत आहेत. पण त्यांचा विकास झालेला नाही. तो करण्याची क्षमता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहे. महायुतीसाठी सर्वकाही व्यवस्थित दिसत असले तरी ही निवडणूक हलक्यात घेऊ नका, गांभिर्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, सदानंद कुथे, गोविंद सारडा, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, आठवले गटाचे मेघनाथ घुटके, कवाडे गटाचे भानारकर, शिवसेनेच्या अमिता मडावी यांच्यासह मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी केले.