गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या मार्कंडा वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघिणीला ज्या ठिकाणी पकडण्यात आले, त्या ठिकाणापासून काही अंतरावर धडापासून डोक्याकडील भाग (मुंडके) गायब असलेला मानवी मृतदेह सापडला. तो मुलचेरा तालुक्यातील लोहारा येथील बापुजी नानाजी आत्राम (४५ वर्ष) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पण या घटनेमुळे वनविभागाने नरभक्षक म्हणून पकडलेली वाघिण तीच आहे का, की वेगळी आहे? असे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्या भागात वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. आधी तिने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले. नंतर विश्वनाथनगर आणि कोठारी येथील दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांना जखमी केले. पण गेल्या दोन आठवड्यात दोन महिलांसह एका पुरूषाचा बळी घेतला. त्यात दि.७ ला चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल आणि दि.१५ ला कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या. यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ताडोबातील शार्प शुटर पथकाला पाचारण केले होते. त्यांनी दि.१८ च्या रात्री एका वाघिणीला बेशुद्ध करून पिंजराबंद केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण अशातच दि.२० ला त्याच भागात बापुजी आत्राम यांचा मृतदेह आढळला.
दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने शोध घेत असताना शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह आढळला. वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. त्यामुळे या भागात इतरही नरभक्षक वाघ नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याशिवाय पकडलेली वाघिण तिघांचा बळी घेणारी आहे की दुसरीच कोणती, याबद्दलही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
































