एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेंदा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते महान आदिवासी क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. आपल्या गावात भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी ताडपल्ली येथील आदिवासी बांधवांनी भाग्यश्रीताई यांच्याकडे मागणी केली होती. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पुतळा उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
गेदा ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथील भूमिया, गाव पाटील तसेच जेष्ठ नागरिकांशी चर्चा करत भाग्यश्री आत्राम यांनी चक्क या कामाचे भूमिपूजन केले. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून गावकऱ्यांची मागणी पूर्ण होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती बेबी नरोटे, संभाजी हिचामी, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर, राकाँचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, भूमिया दुलसा नरोटे, गाव पाटील नामदेव कंगाली, कुटा रेणू कंगाली, दलसु तलांडे, अशोक नरोटे, रमेश मट्टामी, मादी नरोटे, रमेश कंगाली, देवाजी कंगाली, मधुकर कंगाली, धर्मा मट्टामी, लिंगा गोटा, सुधाकर नरोटी आदी गावकरी उपस्थित होते.