अहेरी : तालुक्यातील अनेक रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी आणि रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
नवेगाव, किष्टापूर आणि वेलगुर या तिन्ही गावातील मुख्य रस्ते गुळगुळीत होणार आहेत. या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भूमिपुजनानिमित्त मंत्री धर्मरावबाबा या परिसरात दाखल होताच गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात ढोलताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, किष्टापूरचे उपसरपंच पवन आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, जेष्ठ नागरिक श्रीकांत मद्दीवार, मनीषा सडमेक, वेलगुर टोल्याचे, सडमेक महाराज ग्रा.पं.चे सदस्य रोहित गलबले, वामन मडावी, राजेश्वर उत्तरवार, आशन्ना दुधी, आदिल पठाण, अरविंद खोब्रागडे, बाबुराव सोनुले, आलापल्लीचे ग्रा.पं. सदस्य मनोज बोल्लुवार, ग्रा.पं. सदस्य पुष्पा अलोने, सोमेश्वर रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी, तसेच नवेगाव, किष्टापूर आणि वेलगूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणीही होणार रस्त्यांची कामे
होणार असलेल्या कामांमध्ये बोटलाचेरू फाट्यापासून आलापल्लीकडे पुढे ४ किलोमीटरचे काम केले जाणार आहे. यासाठी १९९.३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दुसरे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवेगाव ते आपापल्ली ते चिंतलपेठ ९.४० किलोमीटरपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ५९०.०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याच परिसरात तिसरे काम ९७.८० लक्ष रुपयांच्या निधीतून नवेगाव ते किष्टापूर (१.७९ किलोमीटर) डांबरीकरण केले जाणार आहे. सर्व कामांचे टेंडर पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.