गडचिरोली : एका शासकीय अभियंत्याला नागपूर येथे हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या युवतीसह तीन युवकांना गडचिरोली पोलिसांनी नागपुरातून अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह नागपुरातील एका पत्रकाराचाही समावेश आहे. या प्रकरणातील आणखी एका महिलेचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ता अभियंता काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे शासकीय कामाने मुक्कामी असताना एका महिलेने त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर बलात्काराची तक्रार करण्याची भिती दाखवत सहकाऱ्यांच्या मदतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
अभियंत्याचा नागपूर येथील जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा येथील हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. यावेळी दोन महिलाही त्या हॅाटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यातील एका महिलेने सहकारी महिला आणि इतर आरोपींच्या मदतीने अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत बलात्काराचा खोटा आरोप लावून पैशाची मागणी केली.
या घटनेत अभियंत्याचा मित्र असलेल्या आरोपी सुशील गवई (पोलिस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा.नागपूर) याला 2 ते 3 लाख रुपये रोख दिले असल्याचे भासवून अभियंत्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर अभियंत्यामुळे महिला आरोपी गरोदर राहिली असा खोटा आरोप लावुन बदनामी करण्याची भिती दाखवली. हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी केली.
अखेर घेतली पोलिसात धाव
हा सर्व प्रकार काही महिने अगोदर घडला. तेव्हापासून अभियंत्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे अखेर त्यांनी गडचिरोली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित आरोपींवर भादंवि कलम 384, 389, 120 (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी दिली. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. या पथकाने अवघ्या 24 तासात नागपूर शहर गुन्हे शाखेच्या मदतीने शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन काढत आरोपी सुशील गवई, रा.हिंगणा, नागपूर, रवीकांत कांबळे रा.नागपूर, रोहित अहिर रा.सुभाषनगर, नागपूर, ईशानी रा.नागपूर यांना ताब्यात घेऊन सोमवारी गडचिरोलीत आणले. आणखी एक महिला आरोपीचा शोध सुरु आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि.अरुण फेगडे करत आहेत.