गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०२३ मध्ये पोलिस यंत्रणेकडून झालेल्या पोलिस शिपाई पदाच्या भरतीत दोन उमेदवारांची त्यांच्या उंचीची पुनर्मोजणी करून त्यांना सेवेत घेण्याची मागणी केली होती. परंतू त्यांचा आक्षेप ग्राह्य न धरल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून पुन्हा उंची मोजण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी चेन्नई येथून उंची मोजण्याचे उपकरण आणले जाणार असल्याचे समजते.
न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि श्रीमती एम.एच.जवाळकर यांनी हा निकाल दिला. यात याचिकाकर्त्यांची बाजू अॅड.कविता मोहरकर आणि अॅड.रितेश दावडा यांनी मांडली.
प्राप्त माहितीनुसार, २०२३ च्या पोलिस भरती यादीत प्रदीप मल्लेलवार आणि सुभाष गुट्टेवार यांची निवड करण्यात आली होती. परंतू उंचीत ते कमी भरल्यामुळे त्यांना पात्र ठरविण्यात आले नाही. या उमेदवारांनी आपली उंची योग्य प्रकारे मोजल्या गेली नसल्याने ती पुन्हा मोजावी अशी विनंती केली. परंतू त्यांचे आक्षेप ग्राह्य धरल्या गेले नाही. त्यामुळे त्यांनी अॅड.मोहरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली.
येत्या ८ फेब्रुवारीला चेन्नई येथील उपकरणासह संबंधित अधिकारी नागपूर येथे त्या दोन्ही युवकांची उंची मोजणार आहे.