मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम मार्गी लागणार

दिल्लीतील सांस्कृतिक कार्य मंत्रालयात बैठक, तांत्रिक अडचण केली दूर

गडचिरोली : गडचिरोलीकरांसोबत विदर्भ आणि महाराष्ट्रातील नागरिकांचे आकर्षण असणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्केंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे अर्धवट असलेले काम आता मार्गी लागणार आहे. खासदार अशोक नेते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री जी.के.रेड्डी यांना या मंदिराच्या बांधकामातील विलंबातील अडचणी दूर करण्याची विनंती केली. त्यानंतर गुरूवारी खा.नेते यांच्या उपस्थितीत पुरातत्व विभागाचे महानिर्देशक बासा, उपमहानिर्देशक जान्हवी शर्मा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. त्यात सदर कामातील तांत्रिक अडचण दूर करून या कामासाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये चर्चा करताना मंदिर बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने काही दिवसातच मार्कंडा देवस्थान येथील मंदिर बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. या बांधकामानंतर मार्कंडा देवस्थानातील भाविक भक्तांना सोयीसुविधा निर्माण होईल. तसेच महाशिवरात्रीला भाविक भक्तांना चांगल्या पद्धतीने मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येईल. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तरवाहिनी असल्यामुळे या स्थळाचे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे. त्यामुळे राज्यभरातून येथे भाविक येतात.