गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धानाची शासनाच्या हमीभावानुसार खरेदी करण्यासाठी ज्या पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे ते पोर्टल तब्बल १३ दिवस बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी (दि.३०) हे पोर्टल अखेर सुरू झाले, पण हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित असताना आता नोंदणीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. अशा स्थितीत पुन्हा पोर्टलवरील नोंदणीची मुदत वाढवून न दिल्यास हजारो शेतकऱ्यांना हमीभावानुसार धान विक्रीपासून वंचित राहावे लागणार आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा धान शासकीय धान खरेदी केंद्रांवर आणण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा आणि बायेमेट्रिक यंत्रावर थम्ब घेऊन नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे शासनाच्या पोर्टलवर ही नोंदणी करण्यास वेळ लागत असल्यामुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू होती. यादरम्यान दोन वेळा नोंदणीसाठी मुदतवाढही मिळाली. पण गेल्या १७ जानेवारीपासून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे संबंधित पोर्टलच तब्बल १३ दिवस ठप्प पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दररोज चकरा मारून रिकाम्या हाताने परतावे लागले. दि.३० ला पोर्टल तर सुरू झाले, पण आाता दोन दिवसात हजारो शेतकऱ्यांची नोंदणी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करत खरेदी केंद्र संचालकांनी नोंदणीसाठी मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी केली आहे. जिल्हाभरात ४० ते ५० हजार शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत.