‘त्या’ आरोपींनी आणखी किती लोकांना अडकविले जाळ्यात? येणार बाहेर

५ पर्यंत पीसीआर, एका तरुणीचा शोध सुरू

गडचिरोली : येथील एका शासकीय अभियंत्याला नागपूर येथे हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या युवती आणि तिच्या तीन सहकाऱ्यांना न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आधी किती जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून किती पैसे उकळले याचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणीची सहकारी असलेली दुसरी एक तरुणी पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही रहस्य समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात ज्या अभियंत्याला फसवल्या गेले त्यांनी गडचिरोली पोलिसात तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथून सोमवारी एका युवतीसह तीन युवकांना ताब्यात घेऊन गडचिरोलीत आणले. बदनामी करण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये नागपूर येथील एका पोलिस कर्मचाऱ्यासह एका पत्रकाराचाही समावेश आहे. पैसे उकळण्याच्या डावात या दोघांचीही भूमिका महत्वाची ठरली. पण अभियंत्याने वेळीच पोलिसात तक्रार केल्याने त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. मात्र त्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने अनेकांना जाळ्यात अडकवून पैसे उकळले असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टिने पोलिस तपास करणार आहेत. या प्रकरणाचा तपास गडचिरोली ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि.अरुण फेगडे करत आहेत.