गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरीसह इतर काही तालुक्यांमध्ये काही दिवसांपासून शासकीय धान खरेदी बंद आहे. त्यामुळे मळणी (चुरणा) करून विक्रीच्या प्रतिक्षेत शेतात ठेवलेल्या धानाच्या पोत्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात तात्पुरत्या झोपड्या बनवून रात्रंदिवस लक्ष ठेवावे लागत आहे. उघड्यावर धान ठेवल्या जाणाऱ्या खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून ताडपत्र्यांचा पुरवठा करण्यात आलेला नसल्यामुळे धान खरेदी बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. पण धानाची भरडाई होत नसल्यामुळे सोसायटीचे आवार धानाच्या गंजांनी भरले आहे. विशेष म्हणजे पावसाचे सावट असताना त्या धानाला चांगल्या प्रकारे झाकण्यासाठी सुस्थितीतील ताडपत्र्याही नाहीत. ताडपत्र्यांचा पुरवठा करावा अशी मागणी केली असताना पुरवठा झाला नसल्यामुळे केंद्रांनी धानाची खरेदीच बंद ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान शेतातच ठेवावा लागत आहे. जोराचा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरीतील उपप्रादेशिक कार्यालयाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
































