‘गडचिरोली महोत्सवा’साठी सज्ज झाले गडचिरोली जिल्हा परिषदेचे प्रांगण

पावसाचे सावट, संध्याकाळी होणार उद्घाटन

गडचिरोली : अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलामार्फत भव्य अशा ‘गडचिरोली महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि.2 फेब्रुवारीला अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

या महोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू असताना शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आयोजकांची थोडी तारांबळ उडाली. या महोत्सवाचे उद्घाटन संध्याकाळी होणार असून सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना दिली.

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात रंगणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा, तसेच बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघांमध्ये या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट, संस्था आपल्या उत्पादनांचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत. यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकारीता उपलब्ध राहणार आहेत. दि. 2 व 3 फेब्रुवारीला सायंकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिध्द टीव्ही कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये गौरव मोरे (हास्यजत्रा फेम), शिवाली परब (हास्य जत्रा फेम), रवीन्द्र खोमणे (संगीत सम्राट विजेता), संज्योती जगदाळे (सूर नवा, ध्यास नवा उपविजेती), प्रथमेश माने (महाराष्ट्र बेस्ट डान्सर विजेता), अपेक्षा लोंढे (महाराष्ट्र बेस्ट डान्सर उपविजेता), आर.जे. आरव (रेडीओ ऑरेंज) आणि आर.जे. भावना (माय एफ.एम.) हे आपली कला सादर करणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक कलाकारही यात सहभाग घेणार आहेत.

4 फेब्रुवारीला महामॅरेथॅान

महामॅरेथॉन 2024 या स्पर्धेत जिल्ह्यातील 13000 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून त्यामध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सहभागी धावपटुंना टी-शर्ट, मेडल्स, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झुंबा सेशन, अल्पोपहार व विजेत्यांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या सर्व खेळाडू व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता नागरीकांनी या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

सदर गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉनच्या तयारीसाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ व सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार परिश्रम घेत आहेत.