देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. या संगीतमय समाजप्रबोधन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचो महासचिव डॉ.नामदेव किरसान होते.
अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडूनच संविधानातील तरतुदींची अवहेलना करून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात समता प्रस्थापित करण्याचे काम केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विषमतेने ग्रासलेल्या समाजात समता प्रस्थापित करण्यात आपले जीवन वेचले. हाच समतेचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात विहित करुन समता, बंधुता व स्वतंत्रता देशात प्रस्थापित व्हावी व ती कायमस्वरूपी टिकून राहावी, अशा प्रकारची रचना संविधानात केली. परंतु या समतेच्या व बंधुतेच्या विचाराला तडा देण्याचे काम विघाटनवादी प्रवृत्ती करीत आहेत. संविधानाच्या तरतुदींना न जुमानता सतत त्यांची अवहेलना केली जात असेल तर देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अपप्रचारला बळी न पडता सद्सदविवेक बुद्धीचा वापर करुन येणाऱ्या काळात निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.