आलापल्लीत आनंद शिंदे यांच्या गीतांची धमाल, शिंदेशाही बाणा ऐकण्यासाठी तुफान गर्दी

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

अहेरी : आलापल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर प्रख्यात गायक आनंद शिंदे प्रस्तुत ‘शिंदेशाही बाणा’ या गीतांच्या कार्यक्रमात शिव, भीम व लोकगीतांनी धमाल केली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक जमले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, लीलाधर भरडकर, पुष्पा अलोणे, सुरेंद्र अलोणे, श्रीनिवास विरगोनवार, सारिका गडपल्लीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

गायक आनंद शिंदे यांचे दोनच राजे इथे गाजले…, नांदण, नांदण, रमाचं नांदण…, ‘माझा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला…’ या आणि भीम, शिव व लोकगीतांच्या बहारदार गाण्यांवर रसिक व प्रेक्षक जबरदस्त थिरकले. आनंद शिंदे यांनी सदाबहार आवाजातून प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून रिझविले.

तिरकमान व बांबूची टोपी भेट देऊन सत्कार


यावेळी प्रख्यात गायक आनंद शिंदे हे पहिल्यांदाच अहेरी उपविभागातील आलापल्ली येथे आल्याने त्यांचे मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी संस्कृती व परंपरेची ओळख असलेली बांबूने बनविलेली टोपी डोक्यावर चढवून आणि तिर-कामठा भेट देऊन तथा शाल-श्रीफळाने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.