जिल्हावासियांनी अनुभवली ऐतिहासिक परंपरा व लोककलेची अनोखी सांस्कृतिक मेजवानी

पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची सांगता

गडचिरोली : आदिवासी समाजाच्या श्रद्धेशी जुळलेले कुँवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित महानाट्याने मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता झाली. हा महोत्सव गडचिरोलीकरांसाठी ऐतिहासिक परंपरा व लोककलेची अनोखी सांस्कृतिक मेजवानी ठरला.

सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात झालेल्या या महासंस्कृती महोत्सवाच्या पाचव्या दिवशी खासदार अशोक नेते, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, प्रसन्नजीत प्रधान, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी विष्णूपंत झाडे, सहायक अधिकारी डॉ.सचिन देवतळे, अग्रणी बँक प्रबंधक युवराज टेंभुर्णे आदिंची उपस्थिती होती.

आदिवासींचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि साधी जीवनशैली आदी महत्त्वाचे पैलू ‘कुवारा भिवसेन’ या महानाट्यातून सादर करण्यात आले. सम्राट संग्रामसिंह, वीरांगना दुर्गावती आणि बख्त बुलंद शाह यांच्या कथांना या महानाट्यातून जोडण्यात आले.

या महानाट्याची निर्मिती रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांची असून प्रस्तुती अमोल खंते यांची होती. नितीन बनसोडे दिग्दर्शित या महानाट्याचे लेखक व गीतकार अमन कबीर यांचे तर प्रकाश संयोजन बाबा पदम, संगीत चतुरसेन, सजावट नकुल रामजी श्रीवास, फायर इफेक्ट्स योगेश हटकर, नृत्य दिग्दर्शक समीर कुमार, वेशभूषा श्रीमंत योगी यांची होती. आपल्या अभिनयाने कार्यक्रमाची रंगत वाढवणारे कलावंत पार्थ तिवारी, राकेश खाडे, रवी पाटील, स्वर्ण नलोडे, समीर दंडारे, निकिता ठाकूर, स्वेता पदकी, नितीन पत्रीवार, करण जामुलकर, आरुष ढोरे यांच्यासह ७० कलावंतांनी हे महानाट्य सादर केले. सुरवातीला डॉ.सचिन मडावी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांना मतदान जनजागृतीची शपथ दिली.

16 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महासंस्कृती महोत्सवात गायक ऋषिकेश रानडे व गायिका आनंदी जोशी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम, त्यानंतर दंडार, गोंधळ, रेला नृत्य, मेघा घाडगे व सहकलाकारांकडून लावणीची पर्वणी तसेच क्रातीवीर बिरसा मुंडा, तसेच कुवारा भिवसेन यांच्या जीवनावरील महानाट्य आणि “हास्य जत्रा“ या कार्यक्रमांतून ऐतिहासिक परंपरा व लोककलेची अनोखी सांस्कृतिक मेजवानी जिल्हावासियांना अनुभवायला मिळाली.