गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे होते. केवळ जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याएेवजी त्यांच्या कार्यातून प्रत्येक पिढीने प्रेरणा घ्यावी, अशी भावना यावेळी राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्त केली.
कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष प्रा.नामदेव जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत मोहिते, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.विकास चित्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचा विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी, त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी, तसेच स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवून आपल्या ध्येयावर फोकस करण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा.जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचा शोध घ्यावा, म्हणजे तुमच्यातूनही कोणीतरी शिवाजी घडेल, असे ते म्हणाले.
समारोपीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांच्या अंगी असलेले कौशल्य, सर्वधर्मसमभाव, समानता, स्वातंत्र, बंधुता, माणुसकी ही मूल्ये त्यांनी रुजविली. या अध्यासन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजावे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत ते कसे पोहोचवता येईल हाच आमचा प्रयत्न आहे.
गोंडवाना विद्यापीठात शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व्हावे यासाठी माजी सिनेट सदस्य प्रा.संध्या येलेकर यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
जनसंवाद विभागाचे प्रा.संजय डाफ आणि मराठीचे प्रा.अमोल चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे डॉ.चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे , सिनेट सदस्य स्वरूप तारगे, सतीश पडोळे तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.विकास चित्ते यांनी, संचालन प्रा.प्रशांत ठाकरे यांनी तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी मानले.