गडचिरोली : भरपूर खनिज संपत्ती असलेला, पण अनेक वर्षांपासून डाव्या विचारसरणीने ग्रासलेल्या राज्याच्या पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यात सामान्य नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य सेवेसोबत उपजीविकेच्या संधींनाही मर्यादित वाव मिळाला आहे. मात्र आता खाण उद्योगामुळे दुर्गम भागातही अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. त्यात हेडरी येथील लॉयड्स मेटल्सतर्फे संचालित काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी ठरत आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड हे छोटेसे गाव आज भारतीय लोहखनिज बाजारपेठेत केंद्रस्थानी आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या आघाडीच्या खाण आणि पोलाद उत्पादन कंपनीला या खाणीची लिज मिळाल्यानंतर आणि तेथील लोहखनिजाचे उत्खनन सुरू झाल्यानंतर या भागात आर्थिक परिवर्तनाव्यतिरिक्त लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम सुरू झाले आहेत.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनद्वारा संचालित लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटलचे (LKAM हॉस्पिटल) उद्घाटन 16 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून या हॉस्पिटलची टीम विविध वैद्यकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे रुग्णालय 30 खाटांच्या सुविधेने सुसज्ज असून यात अत्याधुनिक आयसीयू आणि आपत्कालीन सेवा, प्रसुती सेवा, दंत चिकित्सा, नेत्ररोग आणि बालरोगतज्ज्ञ आहेत. याव्यतिरिक्त डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, स्पायरोमेट्री, ऑडिओमेट्री आणि 24 तास प्रयोगशाळा इत्यादी सेवा मिळत आहेत. आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपी सेवा आणि दिवसभर चालणारी फार्मसी ही हॉस्पिटलची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
अन् वैदूची जागा घेतली डॅाक्टरांनी
गेल्या कित्येक वर्षात या दुर्गम भागातील नागरिक त्यांच्या आजारांसाठी मुख्यतः ‘वैदू’ नावाच्या गावातील डॉक्टरांवर किंवा त्यांच्या घरगुती, स्थानिक उपचारांवर अवलंबून राहात होते. जागरुकतेच्या अभावामुळे आणि विशिष्ट भीतीमुळे, मोठ्या आजारांवर रुग्णालयात जाऊन उपचारही घेतले जात नव्हते. परिणामी प्राणहानी होत होती. पण हे चित्र बदलावे आणि नागरिकांना चांगल्या आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात हे लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांचे स्वप्न होते. लॅायड्सच्या या रुग्णालयामुळे ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज या हॉस्पिटलची स्थापना झाल्यानंतर रुग्णांमध्ये चांगल्या उपचाराबद्दल विश्वास निर्माण झाला. त्यामुळे वैदूवर विसंबून न राहता लोक या हॅास्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यातून आजारपणामुळे होत असलेले मृत्यू कमी करण्यात यश येत आहे. लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल हे तीन ग्रामपंचायती आणि एका नगर पंचायतीमध्ये वसलेल्या अनेक गावांसाठी मैलाचा दगड बनले आहे.
तज्ज्ञ डॅाक्टरांची रुग्णालयात सेवा
दुर्गम भागातील गावकऱ्यांसाठी प्रभावी वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून LKAM हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन औषध, सामान्य औषध, स्त्रीरोग, प्रसुती, बालरोग आणि अनुभवी वैद्यकीय अधिकारी असे पूर्णवेळ डॉक्टर आहेत. याशिवाय ऑर्थोपेडिक, ईएनटी, सामान्य शस्त्रक्रिया, त्वचाविज्ञान, दंतचिकित्सा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर वारंवार हॉस्पिटलला भेट देऊन सेवा देतात. याशिवाय वैद्यकीय शिबिरे देखील घेतली जात आहेत.
आलापल्ली-भामरागडचे नागरिकही घेताहेत लाभ
वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल सक्रियपणे आरोग्य शिक्षण आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे उपक्रमही राबवत आहे. आलेल्या रुग्णांना चांगली वागणूक आणि सेवा मिळत असल्यामुळे गट्टा, एटापल्ली, जांबिया आणि आजूबाजूच्या गावांतून हॉस्पिटलला भेट देणाऱ्या आणि सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दररोज 100 ते 150 झाली आहे. एवढेच नाही तर आलापल्ली आणि भामरागड तालुक्यातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून आणखी विशेष सेवा देण्याची आणि आणखी सुविधा निर्माण करण्याची योजना असून त्यामुळे गडचिरोलीलगतच्या तालुक्यांतील लोकही हेडरीला वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी येतील, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.