निलंबित पोलीस निरीक्षक खांडवे उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात?

अद्याप अटक नाही, एसडीपीओ झरकर यांच्याकडे तपासाची सुत्रे

गडचिरोली : न्यायाधिशांसोबत असभ्य वर्तन, राजकीय नेते आणि नागरिकांना आकसपूर्ण मारहाण अशा प्रकारामुळे वादग्रस्त ठरलेले निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे सध्या कुठे आहे, असा प्रश्न सर्वांचा पडला आहे. प्राप्त माहितीनुसार, खांडवे सध्या नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. झालेल्या घटनाक्रमामुळे मानसिक तणाव येऊन त्यांना उपचार घेण्याची गरज पडली, अशी माहिती सुत्रांनी दिली.

खांडवे यांच्या दादागिरीचे बळी ठरलेले चामोर्शी येथील काही नागरिक आपली व्यथा मांडण्यासाठी पुढे आले. खांडवे यांच्या कायदा हातात घेऊन वागण्याच्या वृत्तीचे असे नवनवीन किस्से समोर येत आहेत. दुसरीकडे ज्या ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती त्या चामोर्शी ठाण्यातच त्यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. परंतू खांडवे यांना अटक होणार का, याची उत्सुकता त्यांच्या रोषाला बळी पडलेल्या नागरिकांसह सर्वांना लागली आहे.

खांडवे ज्या पद्धतीने राजकीय वजनाचा दाखला देत आपले कोणीच काही बिघडवू शकणार नाही, अशा अविर्भावात राहात होते, त्यावरून त्यांना अटक होणार की नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांनी तपास कार्य सुरु केले. मात्र खांडवे यांना अद्याप अटक झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.