आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करुन स्वयंरोजगाराची कास धरा

करिअर मार्गदर्शन शिबिरात आ.कृष्णा गजबे यांचा युवकांना सल्ला

युवकांना मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे

देसाईगंज : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराची कास धरावी, असा मौलिक सल्ला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी युवा वर्गाला दिला.

कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन संस्थेच्या कार्यशाळेत करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आ.गजबे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार करिश्मा चौधरी, देसाईगंज पोलिस स्टेशनचे निरीक्षक किरण रासकर, माजी नगराध्यक्षा शालू दंडवते, मुरलीधर सुंदरकर उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक राजू एम. मुंडे, तालुका कृषि अधिकारी नीलेश गेडाम, प्रा.दिलीप कहुरके, किशोर मेश्राम, संजय कुथे, प्रभाकर गोबाडे, लक्ष्मण रामाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक प्रभाकर साखरे आणि पुनीत मातकर यांनी १० वी व १२ वी नंतर शिक्षणाच्या संधी व व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. अनुराग बोरकर यांनी स्वयंरोजगार व शिक्षणाकरिता कर्जाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल पवार यांनी व्यवसाय उभारून उद्योजक होण्याचे ध्येय बाळगण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला वडसा, आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील सातशे युवक-युवती उपस्थित होते. संचालन सतीश मेश्राम तर आभार प्रदर्शन विष्णू नागमोती यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे गटनिदेशक रविकान्त गोतमारे, डी.व्ही. सुर, रविंद्र लोही, माया जाधव, गुणवंत वांढरे, दीपक बोकडे, राकेश भोयर, टी.यू. सोयाम, लता लाडे, संदीप पिलारे, हेमंत मरसकोल्हे, गजानन ठाकरे आदींनी सहकार्य केले.