गडचिरोली : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या नावावर गेल्या 8 ते 10 वर्षांपूर्वी मंदिराची उकल करण्यात आली, पण एक दशकाचा काळ लोटूनही प्रशासन व पुरातत्व विभागाने हे काम पूर्णत्वास नेण्याकडे कानाडोळा केला होता. या मंदिराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हरणघाटचे मुरलीधर महाराज यांनी मार्कंडा येथे उपोषण सुरू केले होते. शनिवारी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मंदिराला भेट दिली असताना प्रशासनाने हे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन मुरलीधर महाराजांनी उपोषण समाप्त केले.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. जशी काशी येथे गंगा नदी उत्तरवाहिनी होते, तशीच मार्कंड येथे वैनगंगा नदी ही उत्तरवाहिनी होते. यामुळे येथील शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे प्रचंड मोठी अशी जत्राही भरते.
मुख्य मंदिराचा काही भाग अनेक वर्षांपूर्वी वीज पडून खचल्यामुळे या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पुरातत्व विभागाने १० वर्षांपूर्वी हाती घेतले होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा केला, पण मंदिर खोलून नंतर हे बांधकाम अर्धवट ठेवल्याने भाविकांमध्ये असंतोष वाढत होता. हे काम लवकर पूर्ण करावे यासाठी मार्कंडातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती देऊन हे काम १५ दिवसात सुरू होईल अशी ग्वाही नागरिकांना दिली होती. त्यानंतर १ मार्चला हे काम सुरू करत असल्याचेही पुरातत्व विभागाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले होते.
जनभावना लक्षात घेऊन ना.विजय वडेट्टीवार यांनीही मंदिराची दुरवस्था लवकर दूर करण्यासंदर्भात प्रशासन व पुरातत्त्व विभागाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. शनिवारी प्रत्यक्ष भेटीदरम्यान तहसीलदार प्रशांत घरुडे, पोलिस निरीक्षक पाटील, जनआंदोलन व उपोषण समितीचे पदाधिकारी यांच्याकडून परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सांगितले. प्रशासनाच्या वतीने १ मार्चला हे काम सुरू करत असल्याबद्दल लेखी आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेसचे अनुसूचित जमातीचे प्रदेश अध्यक्ष, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.