संत-महापुरूषांच्या महाराष्ट्राला धार्मिक राजकारणाकडे नेण्याचा प्रयत्न हाणून पाडा

निर्भय बनो सभेत विश्वंभर चौधरी यांचे आवाहन

गडचिरोली : महाराष्ट्रात धार्मिक राजकारणाची परंपरा कधीही नव्हती, पण उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राला धार्मिक राजकारणाकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे, हा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी गडचिरोलीतील जाहीर सभेत केला.

‘निर्भय बनो’ अभियानांतर्गत समविचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी चौधरी यांचे व्याख्यान येथील राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणात आयोजित केले होते. यावेळी त्यांनी लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी निर्भय बनण्याचे आवाहन करत सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी विद्रोही वक्ते गोविंद पोलाड यांनीही परखडपणे आणि वऱ्हाडी ठसक्यात आक्रमक भाषण देऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. याशिवाय अॅड.असिम सरोदे यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांना हात घातला. तसेच निर्भय बनो अभियानामागील भूमिका स्पष्ट केली.

या व्याख्यानाला श्रोते म्हणून सर्चचे संचालक डॅा.अभय बंग, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, डॅा.सतीश गोगुलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला-पुरूष, युवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.