गडचिरोली : अर्धे काँग्रेसवाले सनातनी असून ते भाजपचा सामना करू शकणार का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची निती वेगळी नाही. दोन्ही पक्ष आदिवासी, बहुजन समाजाला तुकड्यांमध्ये वाटून हुकूमत गाजवण्याच्या भावनेने काम करतात. त्यामुळे आम्हाला सत्तेतील सन्मानजनक हक्क मिळवून घेताना आपला स्वाभिमान जोपासला पाहिजे, असा सल्ला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.सुरेश माने यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने आंबेडकरी कार्यकर्ता महामेळावा व निर्धार सभेचे आयोजन रविवारी इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात केले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या मेळाव्याचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, ज्येष्ठ विचारवंत लटारू मडावी, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, कॉम्रेड अमोल मारकवार, युवा नेते विनोद मडावी, महासचिव इंजि.संजय मगर, महिला आघाडीच्या पूनम घोनमोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील डावे, आंबेडकरवादी पक्ष संपविण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आजपर्यंत कटकारस्थाने केली आहेत. अशा स्थितीत आम्ही कोणासोबत जावे हाच मोठा प्रश्न आहे. वास्तविक आंबेडकरी डीएनए हा काँग्रेसविरोधी आहे. पण संघ परिवाराला रोखण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे. याचा अर्थ बाबासाहेबांनी शिकविलेला स्वाभिमान आम्ही सोडणार आहोत असे काँग्रेसने समजू नये, असेही ॲड.माने यांनी ठणकावून सांगितले.
भाजप सरकारच्या सत्ताकाळात महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाईच्या झळा सोसाव्या लागल्या असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजनवादी महिलांनी मोदी-शहांच्या विरोधात मते मिळवण्यासाठी काम करावे, असे आवाहन उद्घाटक जयश्री जराते यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रितेश अंबादे यांनी तर प्रास्ताविक जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहराध्यक्ष प्रतीक डांगे, गोकुळ ढवळे, सचिन गेडाम, मुन रायपुरे, देवा वनकर, सविता बांबोळे, विद्या कांबळे, प्रतिमा करमे, नीलम दुधे, ईशा दुर्गे, करुणा खोब्रागडे, विभा उमरे, शोभा खोब्रागडे, आवळती वाळके, विद्यार्थी मोर्चाचे कमलेश रामटेके, राजेश्वरी कोटा, सतीश दुर्गमवार, अक्षय कोसनकर, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, देवेंद्र भोयर, थामस शेडमेक, किशोर नरुले, जितू बांबोळे, पियुष वाकडे यांनी परिश्रम घेतले.