गडचिरोली : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ११० किलोमीटरवर असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे भरलेल्या यावर्षीच्या समक्का-सारक्का देवीच्या यात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दि.२१ ते २५ असे पाच दिवस ही यात्रेत मोठी गर्दी होती. आता गर्दी ओसरली असली तरी भाविकांचे दर्शनासाठी जाणे सुरूच आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीच्या दक्षिण भागातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.
या यात्रेसाठी तेलंगणा सरकारने सिरोंचा येथून विशेष बसफेऱ्यांची सुविधा दिली होती. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली. गोदावरी नदीवर आंघोळ करून भाविक देवीच्या दर्शनाला जाऊन साकडे घालतात आणि नवसही फेडतात. नदीत आंघोळ करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तेलंगणा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली.