गडचिरोली पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या महिला नक्षलवादी राजेश्वरीला अटक

छत्तीसगडची रहिवासी, सहा लाखांचे इनाम

गडचिरोली : छत्तीसगडसह गडचिरोली पोलिस दलासोबतच्या अनेक चकमकीत सहभागी होऊन पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (30 वर्ष) या जहाल महिला नक्षलीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाखांचे इनाम ठेवले होते.

एप्रिल 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील केडमारा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहभागी असल्याने तिच्यावर भामरागड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. ती मूळची छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. यापूर्वी 2019 मध्ये छत्तीसगड पोलिसांनी तिला अटक केली होती, पण कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा ती नक्षल चळवळीत सक्रिय होऊन दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत एरिया कमिटी मेंबर (एसीएम) या पदावर कार्यरत होती.

सध्या नक्षलींचा टीसीओसी काळ सुरू असल्याने नक्षलवादी हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या यशस्वी होऊ न देता एका जहाल महिला नक्षलीला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. सन 2006 साली चेतना नाट्य मंचामध्ये सदस्य पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रिय झाली होती. विविध पदांवर तिने काम केले. सन 2019 मध्ये बिजापूर (छ.ग.)च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने तिला अटक करण्यात आली होती. मात्र सन 2020 मध्ये ती कारागृहातून सुटली. तिच्यावर चकमकीचे छत्तीसगडमध्ये 3 तर महाराष्ट्रात 1 गुन्हा दाखल आहे.

गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवायांमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत 73 नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन माओवाद्यांना केले आहे.