गडचिरोली : सरपंच, सचिव आणि अधिकाऱ्यांची ‘ग्रामविकास मंथन’ या विषयावर जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्याशाळा सुमानंद सभागृहात झाली. सदर कार्यशाळेत सर्व विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सरपंच, गटविकास अधिकारी तथा कर्मचारी यांच्यासोबत ग्रामविकासावर मंथन करण्यात आले.
जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना उच्च दर्जाच्या व टिकाऊ स्वरूपात करण्यात येत आहेत. सौर उर्जेवर आधारित दुहेरी हातपंप योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा आणि भूगर्भातील पाण्याचा साठा हा मर्यादित असल्याने त्याचा वापर जपून करावा, असे प्रतिपादन या कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले.
सदर कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार, प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रवींद्र कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) चेतन हिवंज, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पुरवठा) नितीन पाटील, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी हेमंत ठाकूर, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी कुमरे, कृषी विकास अधिकारी तुमसरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाकाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैभव बारेकर, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. देसाईगंज तालुका हा जिल्हयात प्रथम “हर घर जल” घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतमध्ये कामे पूर्ण झालेली आहेत, ती व्यवस्थित राहावी यासाठी बचत गटांसोबत करार करून कामे करावीत, असे सूचित केले. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट कशी लावावी व त्यापासून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
डॉ.दावल साळवे यांनी आरोग्य विभागामार्फत असणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना ग्रामस्तरावर नागरिकांनी गोल्डन कार्ड काढून आरोग्याशी संबंधित विविध आजारांवर उपचार करण्याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
जिल्हा पेसा समन्वयक निलेश वाकडे यांनी पेसा कायदा कसा अंमलात आणण्यात आला याबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणातून दिली. मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी हेमंत ठाकून यांनी लेखाविषयक बाबींवर विस्तृत माहिती देताना लेखा आक्षेप तत्काळ पूर्ण करणे, सेवानिवृत्त झालेल्यांना तात्काळ सेवा कशी देता येईल, सरपंचांनी स्वतःची ई-स्वाक्षरी स्वतःजवळच ठेवून अपहार टाळावा असे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत इतरही विभाग प्रमुखांनी त्यांच्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सरपंच, सचिव यांच्यासोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
सरपंच-सचिव आणि उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार
यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत दिमना येथील सरपंच तथा सचिव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तालुका, तालुक्याअंतर्गत उत्कृष्ट कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी, संचालन अमित माणुसमारे, तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) चेतन हिवंज यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कर्मचारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, पंचायत विभागाचे कर्मचारी, नरेगाचे कर्मचारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी आदी विभागांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.